आझाद मैदानातील आंदोलनात


NHM ग्रामीण अंमळनेर तालुका येथील आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले..


अंमळनेर THO ऑफिस येथे निवेदन देण्यात आले..


लोक न्यूज-
राज्यातील आरोग्य खात्यामधील कंत्राटी परिचारिकांनी आज आपल्या मागण्यांसाठी हल्लाबोल करीत आझाद मैदानात आंदोलन केले. कायमस्वरूपी नोकरीसाठी त्यांनी घोषणाबाजी करत आझाद मैदान दणाणून सोडले.

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनचे अध्यक्ष दिलीप उटाणे, कार्याध्यक्ष रेखा टरके, सरचिटणीस संगीता रेवडे, अंजली राठोड, स्वप्नाली ठक्कर आणि संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेनऊपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 3000 परिचारिकांनी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली. कायम नोकरीची मागणी करत ३६ जिल्ह्यांतील परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. २४ तास सेवा देऊनही १७ हजार पगारात संसाराचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. १७ वर्षे काम केल्याने नोकरीत कायम करावे. तो आमचा हक्कच असल्याने आम्हाला कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी त्यांची मागणी होती.

सरकार म्हणते, पैसा नाही मग नोकरीत कायम कसे करणार? सरकार दिशाभूल करत आहे. आरोग्य सेवेत काम करणाऱ्या परिचारिकांच्या कुटुंबांचे आरोग्य आणि नोकरी सुरक्षित ठेवणे सरकारचे कर्तव्य आहे. आम्हाला नोकरीत कायम करायलाच हवे. - रेखा टरके, आंदोलनाच्या नेत्या

बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी आंदोलनात सहभागी होत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. परिचारिकांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले. नोकरीत कायम करणे त्यांचा हक्क असून तो त्यांना मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.

कायमस्वरूपी सेवेत असलेल्या परिचारिकांना ७० ते ८० हजार मासिक पगार मिळतो. आम्ही २४ तास ग्रामीण भागात सेवा देऊनही आमच्या हातात अवघे १७ हजार रुपये वेतने येते. त्यात घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न आंदोलनात सहभागी परिचारिकांनी केला.