लोक न्यूज-
अमळनेर-गेल्या काही वर्षांपासून विधानसभेची आमसभा झालेली नसताना जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमसभा त्वरित घ्यावी अशी मागणी अमळनेर भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख यांनी केली असून यासंदर्भात आमदार अनिल पाटील यांना जाहीर पत्र त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून दिले आहे.
आपण दिलेले हे जाहीर पत्र तमाम जनतेचे पत्र समजून आमदार साहेब त्वरित यावर अंमलबजावणी करतील अशी अपेक्षा देखील देशमुख यांनी या पत्रात केली.आमसभेसंदर्भात दिलेल्या या जाहीर पत्रात देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की शासन धोरणानुसार घेतली जाणारी आमसभा म्हणजे जनतेचे व्यासपीठ असून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समक्ष जनतेच्या प्रश्नांचा निपटारा होणे हीच आमसभेची खासियत असते यामुळे विशेष करून ग्रामिण जनता आमसभेची आतुरतेने वाट पाहत असते परंतु गत काही वर्षांपासून अमळनेर विधानसभेची आमसभाच झालेली नसल्याने आमसभा घेण्याची तरतुदच रद्द झाली की काय?असा समज जनतेचा झाला आहे.गेली दोन अडीच वर्ष विद्यमान आमदारांनी आमसभा घेतली नाही आता तशी सभा घेण्यास कोणतीही अडचण नसून तशी गरज देखील आता निर्माण झालेली आहे.
अमळनेर तालुक्यात तहसील कार्यालय,पंचायत समिती, संजय गांधी व श्रावण बाळ योजना,वीज कंपनी, सिटी सर्व्हे,कृषी विभाग,आरोग्य विभाग आदी ठिकाणी जनतेचे,शेतकरी बांधवांचे तथा अपंग व दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून आमसभा घेतल्यास निश्चितपणे ते सुटून जनतेला न्याय मिळणार आहे.तेव्हा ही महत्वपूर्ण आमसभा घेण्यासाठी आमदार साहेब आता मुळीच विलंब करणार नाही अशी अपेक्षा शितल देशमुख यांनी व्यक्त करत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा असे या जाहीर पत्राद्वारे केली आहे.

