लोक न्यूज
अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द येथे एका नवजात अर्भकाला उघड्यावर टाकून दिल्याची आणि त्याच्या पोटाचे लचके तोडलेली अवस्था असल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (११ डिसेंबर) दुपारी पावणे चारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप आणि चिंता व्यक्त होत आहे.
घटनास्थळाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उदय निंबा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अमळनेर–मुडी रस्त्यावर कैलास भगवान पाटील यांच्या बंद घराजवळ एक नवजात अर्भक टाकून दिल्याचे निदर्शनास आले. अर्भकाचे पोटाचे लचके तोडलेले असून शरीरावर गंभीर जखमा असल्यामुळे हा प्रकार अमानुषतेची पराकाष्ठा मानला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने अर्भकाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता अर्भक मृत अवस्थेत असल्याचे घोषित केले.
या बाबत मारवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ९४ (नवजात अर्भकाच्या मृत्यूसंबंधी गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.
घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. स्थानिकांमध्ये या क्रूर कृत्यावरून संताप व्यक्त होत असून पोलीस गुन्हा करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अर्भकाला कोणी आणि का टाकून दिले, तसेच त्याच्या मृत्यूस जबाबदार कोण हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.