.            अपघातापूर्वी लावलेले बॅरिकेट

.         अपघातानंतर लावलेले बॅरिकेट

लोक न्यूज
अमळनेर : पारोळा-अमळनेर मार्गावरील भोकर धरणाजवळ रस्त्याचे अपूर्ण काम आणि सुरक्षिततेच्या नियोजनाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. आर. बी. पाटील इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून लावण्यात आलेल्या बॅरिकेट्सच्या जागेबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. गेल्या तीन दिवसांपासून हा परिसर अपघातप्रवण बनल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या धोकादायक परिस्थितीकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रुबजीनगर, अमळनेर येथील मंगेश जगताप यांचा याच ठिकाणी झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आणि दिवाळीचा आनंद क्षणात दुःखात बदलला.
या दुर्दैवी घटनेनंतर आता बॅरिकेट्सच्या व्यवस्थेत बदल करून ते कपचीच्या ढिगाऱ्यापुढे लावण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की, अपघात होण्यापूर्वीच बॅरिकेट्स योग्य ठिकाणी लावले असते, योग्य दिशादर्शक फलक आणि रात्री दिसणारे रिफ्लेक्टर लावले असते, तर हा अनर्थ टाळता आला असता का?
अपूर्ण रस्ता, चुकीचे बॅरिकेट्स अन् सुरक्षिततेचा अभाव!
पारोळा-अमळनेर मार्गावरील भोकर धरणाजवळ रस्त्याचे काम अपूर्ण असताना वाहनचालकांना योग्य सूचना देणे, धोकादायक ठिकाणी बॅरिकेट्स लावणे, रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था ठेवणे आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात बॅरिकेट्सच्या मांडणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मंगेश जगताप यांच्या अपघाती मृत्यूनंतर बॅरिकेट्सची जागा बदलण्यात आल्याने आधीची व्यवस्था योग्य होती का, हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या अपघातामागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. केवळ बॅरिकेट्सची जागा बदलून जबाबदारी संपत नाही, तर अपघातापूर्वी सुरक्षिततेची योग्य खबरदारी का घेतली गेली नाही, याचीही चौकशी झाली पाहिजे.


— मंगेश जगताप यांचा जीव जाण्यापूर्वीच बॅरिकेट्स योग्य ठिकाणी लावले असते, तर आज एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असता का?
आता तरी संबंधित कंपनी, रस्ते प्रशासन आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी जागे होऊन भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.