अमळनेर (लोक न्यूज)
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानातील मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील सभा मंडपाला बुधवारी (१ जुलै) रात्री अचानक भीषण आग लागून सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांच्या सागवान लाकडाच्या बांधकामासह इतर साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात आगीची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी अनिकेत विकास देव (वय ४०, रा. वाडी चौक, अमळनेर) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १ जुलै रोजी रात्री ८ ते ८.१५ वाजण्याच्या सुमारास ते मंदिरासमोर उभे असताना सभा मंडपाच्या आतील बाजूने धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तसेच इतर भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली असता सभा मंडपाला आग लागल्याचे दिसून आले.
त्याचवेळी मंडपातील इलेक्ट्रिक वायरिंगजवळ शॉर्टसर्किट होऊन खाली अंथरलेल्या सतरंजीवर ठिणग्या पडत असल्याचे दिसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर अनिकेत देव यांच्यासह अतुल सदाशिव कुलकर्णी, कुणाल दिलीप भावसार, अनिल अमृत जाधव, सुरजसिंग अर्जुनसिंग परदेशी, प्रमोद गंगाराम जाधव आणि इतर भाविकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वेगाने पसरल्याने ती नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही.
यानंतर सुरजसिंग परदेशी यांनी अमळनेर अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सभा मंडपातील सागवान लाकडाचे संपूर्ण बांधकाम तसेच इतर साहित्य जळून खाक झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक शरद काकळी हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अंतिम पंचनामा तपासानंतर स्पष्ट होणार आहे.