लोक न्यूज

जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, पातोंडा येथे विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, पातोंडा येथील मुख्याध्यापिका सौ. सुनीता प्रदीप लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मुलांच्या व मुलींच्या शाळेतील सर्व शिक्षिका सौ. प्रियंका शिंदे, सौ. वैशाली सोनवणे, श्रीमती सुषमा तायडे, सौ. छाया इसे तसेच श्री. स्वप्नील शिंदे व सागर भोई उपस्थित होते. कार्यक्रमाला शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलात्मक वस्तू, हस्तकला साहित्य, तसेच कार्यानुभवावर आधारित प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार या प्रदर्शनातून पाहायला मिळाला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुनीता लोहारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला वाव देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक असून यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सुषमा तायडे व सौ. छाया इसे यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना एक नवे बळ मिळाले आहे.