लोक न्यूज
अमळनेर:-शहरात 14 मे रोजी छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त "स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे महानाट्य"चे आयोजन करण्यात आले असुन संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने आणि जयनिल फाऊंडेशनच्या अनमोल सहकार्याने या महानाट्यचे सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे.
सामाजिक जाणिव आणि विविध क्षेत्रात असलेल्या उणिवा पूर्ण करण्यासाठी अमळनेरात जयनिल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून १४ मे रोजी छत्रपती संभाजी राजेंच्या जयंतीनिमित् संस्थेच्या कार्याचा प्रारंभ म्हणून हे महानाट्य आयोजित करण्यात आले असल्याची माहिती युवा उद्योजक तथा आमदार अनिल पाटील आणि माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांचे सुपुत्र गौतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तर संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने नाट्य कलाकार निकेश राजपुत यांनी माहिती देताना सांगितले की अमळनेर शहरात 14 मे रोजी सादर होणाऱ्या या महानाट्यात सुमारे 250 कलाकार असून संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदानाची गाथा या महानाट्यातून सादर होणार आहे. संस्कृती फाऊंडेशन तसेच सात्विक ठकार लिखित व राकेश राजपूत दिग्दर्शित या महानाटकात उत्तर महाराष्ट्रातील कलाकार असून जवळपास 100 पेक्षा अधिक कलाकार अमळनेर सह परिसरातील आहेत.ज्या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही अथवा परिस्थितीमुळे मिळू शकले नाही त्यांना संधी देण्याचा संस्कृती फाऊंडेशनचा उद्देश आहे.या महानाट्यचे अमळनेरच्या पूर्वी नंदुरबार, धुळे आदी ठिकाणी तीन यशस्वी प्रयोग झाले असून अमळनेरात चवथा आणि पाचवा प्रयोग होणार आहे.यासाठी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून स्थानिक कलाकारांना प्रशिक्षण दिले जात असून सिनेमा एक आर्टिफिशियल स्ट्रक्चर असतो परंतु महानाट्य ही एक वेगळी संकल्पना असून लाईव्ह इतिहास आपल्या समोर सादर होणार आहे.आमदार अनिल पाटील व जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील यांनी विशेष असे योगदान दिल्याने आम्हाला बळकटी मिळून जास्तीजास्त तरुणाईला हे महानाट्य दाखविण्याचा उद्देश त्यांनी व्यक्त केला असल्याचे निकेश राजपूत यांनी सांगितले.तसेच या महानाट्यच्या माध्यमातून जळगाव व अमळनेर येथे संस्कृती कला विद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यात स्थानिक कलाकारांना अभिनय व्यक्तिमत्व विकास, स्वसंरक्षणचे धडे दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गौतम पाटील यांचे तरुणाईला आवाहन
जयनिल फाऊंडेशनचे गौतम पाटील पुढे म्हणाले की अमळनेर तालुक्यातील व परिसरातील गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी असतील तर त्यांना मदत करणे, सर्वे करून सामाजिक गरजा पूर्ण करणे, तरुणांना रोजगार देण्यासाठी रोजगार मेळावे घेणे, व्यक्तिमत्व विकास घडवणे,युवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे,क्रीडा गुणांना वाव देणे,आरोग्य समस्या सोडविणे हा जयनिल फाऊंडेशनचा उद्देश असून छत्रपती संभाजी राजे हे तरुणाईचे आदर्श असल्याने खास महाविद्यालयीन युवकांसाठी जयनिल फाऊंडेशनच्या वतीने एक प्रयोग राखीव ठेवण्यात आला आहे.यात केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून तरुण मित्रांनी आणि मैत्रिणींनी आपले पासेस आजच आमच्या कार्यालयातून घेऊन जावेत असे आवाहन गौतम पाटील यांनी केले.
सदर पत्रकार परिषदेस नयना कुलकर्णी सह संस्कृती फाउंडेशनचे कलाकार हजर होते.