लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावचे सुपुत्र व गडचिरोली पोलीस दलातील नक्षलविरोधी अभियान पथक येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सतीश वामन पाटील यांना गडचिरोली येथील  नक्षलग्रस्त अति संवेदनशील व अति दुर्गम असलेल्या ठिकाणी केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मानचिन्ह पदक जाहीर झाले असून त्यांना महाराष्ट्र दिनी (1 में) 2024 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

           शेतकरी कुटुंबातील सतिश  पाटील यांनी जिद्द व चिकाटीने आपले पोलीस उपनिरीक्षक पदाचे स्वप्न पूर्ण केले. 
सतीश पाटील हे 2021 पासून  गडचिरोली जिल्ह्यात नक्षल विरोधी अभियान राबविणाऱ्या पथकांमध्ये (C- 60) काम करत आहेत. गडचिरोली मध्ये नक्षलविरोधी अभियान राबवित असताना अनेक  पोलीस-नक्षल चकमकी मध्ये ते सहभागी आहेत. सतत नक्षलवाद्यांशी त्यांच्या पथकाचा सामना झालेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बद्दल यापूर्वीच दि.15 ऑगस्ट 2023 रोजी मा.राष्ट्रपती, भारत सरकार यांचे पोलीस शौर्य पदक देखील त्यांना प्रदान करण्यात आले आहे.


पथकाने केलेल्या कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी त्यांचे कौतुक केले. यादरम्यान महाराष्ट्र -छत्तीसगड राज्य आंतरराज्य समनव्यक अधिकारी म्हणून देखील त्यांनी सेवा केली आहे. अति संवेदनशील नक्सलग्रस्त भागामध्ये नवीन पोलीस मदत केंद्र उभारणी साठी त्यांनी आपले योगदान दिले. पोलीस यंत्रणा व प्रशासन करत असलेल्या कम्युनिटी पोलिसिंग व लोककल्याणकारी उपक्रमामुळे नक्सल हालचाली कमी होत असल्याने नक्षल समस्या कमी होत आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात येत आहे. पाटील यांना मिळालेल्या या गौरवा बद्दल त्यांचे मुळगाव रणाईचे सह अमळनेर तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे