लोक न्यूज-
अमळनेर : जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रतिष्ठा भाजपची पणाला लागणार आहे, कारण त्यांना विजयी मालिका कायम राखायची आहे. दुसरीकडे वारंवार गद्दारीचा उल्लेख करणाऱ्या उद्धवसेनेनेदेखील वेगळे काही केले नाही, तर भाजपमधून आलेल्या नवख्या चेहऱ्याला दोन दिवसांत उमेदवार बनवले. त्याला उद्धवसेनेचे निष्ठावान सैनिक किती प्रतिसाद देतील, हे काळच ठरवेल.

स्मिता वाघ यांच्या माध्यमातून ५३ वर्षांनंतर अमळनेरला खासदार मिळणार, म्हणून व्यक्तिनिष्ठा ठेवणारे अनेक मतदार आहेत. तसा स्वाभिमान साहजिकच पारोळ्यातही असणार आहे. पवार यांना निष्ठावान शिवसैनिकांना आपलेसे करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

मंत्री अनिल पाटील हे अजित पवारांशी निष्ठा असलेले. तर माजीआमदार शिरीष चौधरी यांची निष्ठा देवेंद्र फडणवीस यांच्याशी, अशी सगळी विचित्र पार्श्वभूमी असताना, पारोळ्यात करण पवार व त्यांचे काका डॉ. सतीश पाटील यांची सांगड बसेल का, हा कळीचा मुद्दा आहे. कोणाला बळ दिले म्हणजे पुढे विधानसभेला आपल्याला त्रास होणार नाही, याची चाचपणी डॉ. सतीश पाटील, आमदार चिमणराव पाटील करीत आहेत. तशीच चाचपणी अमळनेरातही मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी करीत आहेत.


लोकसभा निवडणुकीतील पक्षनिष्ठा आणि व्यक्तीनिष्ठेचे निर्णय चुकल्यास विधानसभा निवडणुकीत अमळनेर, पारोळा- एरंडोल, जळगाव, भडगाव-पाचोरा आणि चाळीसगाव या मतदारसंघांत नवे नेतृत्व उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षनिष्ठा आणि व्यक्तीनिष्ठा यांची सांगड जो उमेदवार घालेल, त्याचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो.