नरडाणा-लोक न्यूज
(सतीश चोरडिया)
धुळे जिल्ह्यातील व शिंदखेडा तालुक्यातील महत्वपूर्ण असलेल्या नरडाणा पोलीस पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सध्या अचानक विविध गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने नरडाणा पोलीस स्टेशन कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाले आहे.
ठाकरेंचा समारोप व पाटलांचे स्वागत :-
नरडाणा पोलीस स्टेशनचे सपोनी मनोज ठाकरे यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची एन नरडाणा ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या तोंडावर बदली करण्यात आली. आणि त्यांच्या जागी सोनगीर पोलीस स्टेशनचे सपोनी चंद्रकांत पाटील यांची नरडाणा पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली. निवडणूक अगदीच काही दिवसांवर असताना झालेल्या या बदलीचे विविध राजकीय पदाधिकाऱ्यांना आश्चर्य वाटले. नरडाणा सह परिसरातील विविध गावांमध्ये अनेक बूथ संवेदनशील असताना अचानक झालेल्या या बदली मागचे रहस्य कळण्याच्या आतच चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारला.
ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीतील यशस्वी कामगिरी :-* चंद्रकांत पाटील यांच्या पदभाराची सुरुवातच परिसराच्या विविध गावांच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीने झाली. ग्रामपंचायत निवडणुकीचे आव्हान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी आपले अनुभव, आपली कार्य कुशलता, व आपल्या सगळ्या नव्या टीमचे कौशल्य पणाला लावून पाटील यांनी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणतेही गालबोट न लागू देता कायदा व सुरक्षेच्या चौकटीत या निवडणुका व निवडणुकीनंतरच्या विजयी मिरवणुकीच्या रणधुमाळीला हाताळण्यात यश प्राप्त झाले. यामुळे नरडाणा सह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावही झाला, परंतु अल्पावधीतच त्यांच्या कारकिर्दीत विविध घटनांनी डोके वर काढले.
सिंघम एन्ट्री ने प्रसिद्धीस झोतात :- चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला अमली पदार्थ विरुद्ध कारवाई करत सात लाखाचा मुद्देमालासह आरोपींना अटक केली, नंतर बेटावर परिसरातून जाणाऱ्या गो-तस्करांच्या गाडीला पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. यामुळे पाटील यांची कारकीर्द पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली. यामुळे गुन्हेगार धास्तावले हे मात्र निश्चित खरे, परंतु गाव पातळीवरील गुन्ह्यांमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली.
अल्पावधीतच कारकिर्दीला ग्रहण :- परिसरात विविध गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात पाटील जरी यशस्वी झाले असले तरी परिसरातील विविध गावांमध्ये नित्याने घडणाऱ्या विविध घटनांनी त्यांची डोकेदुखी मात्र निश्चितच वाढवली. वालखेडा येथे रात्रीतून पुतळा ठेवल्याची घटना घडली असेल, बेटावद येथे दोन समुदायांमध्ये झालेली दंगल असेल, नरडाणा गावात मध्यंतरी एका घटनेमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण, बँक जवळच्या परिसरातून महिलेच्या पर्समधून लंपास केलेले एक लाख रुपये असेल, तर अगदीच काही दिवसापूर्वी घडलेली विटाई मधील हाणामारीची घटना. या सर्वच घटकांमुळे पाटील यांची डोकेदुखी सध्या मात्र निश्चितच वाढली आहे.
जनता व पोलीस मध्ये सुसंवाद नाही :-नरडाणा पोलीस स्टेशन मध्ये सपोनी चंद्रकांत पाटील यांच्या हाताखाली दोन पोसई आहेत. पोसई कुवर, तर दुसरे पोसई राम दिवे असे दोन अधिकारी असताना विविध सण उत्सवांच्या काळातही नरडाणा पोलीस व जनतेमध्ये सुसंवाद राहील यासाठी बनवण्यात आलेल्या शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीच्या सदस्यांच्या गेल्या काही महिन्यांमध्ये कोणत्याच बैठका आयोजित करण्यात आल्या नाहीत. विविध जातीय व धर्माचे विविध सण साजरे होत असताना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या या सुसंवादाच्या अभावामुळेच किंबहुना या घटना घडल्या असाव्यात असे अनेकांचे मत आहे. जवळजवळ सर्वच नव्या आलेल्या कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी साधा परिचय नाही. शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीच्या सदस्यांची नव्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना साधी तोंड ओळख नाही. विविध शासकीय कामासाठी लागणाऱ्या कागदावरच्या आकडेवारीला पूर्ण करण्यात यशस्वी असलेल्या पाटील यांनी, परिसरातील जनतेच्या काळजात सुद्धा स्थान प्राप्त करावेे हीच या मागची अपेक्षा. समन्वयाच्या मीटिंगा व सुसंवाद साधल्याशिवाय घटनांचा हा आलेख उतरणार नाही हे मात्र इतकेच खरे.
