लोक न्यूज

अमळनेर : श्री मंगळग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे हा मंगल महायोग दर २७ वर्षांनी येतो. हा मंगल महायोग येत्या २ सप्टेंबर रोजी येत असून या समारोहात भारतातील कानाकोपऱ्यातून भाविक अमळेनरात दाखल होणार आहेत. त्यांची असुविधा होऊन अमळनेरचे नाव खराब होऊ नये तसेच श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय होण्यासाठी स्वयंस्फुर्तीने सेवा द्या, असे आवाहन खा. स्मिता वाघ आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी उपस्थितांना केले.
    श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त २९ आणि ३१ ऑगस्ट तसेच २ सप्टेंबर रोजी भव्य-दिव्य स्वरुपात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांच्या आयोजन-नियोजनासाठी २४ रोजी श्री मंगळग्रह मंदिराच्या प्रसादलायत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम होते.
   

आमदार पाटील पुढे म्हणाले की, आपल्या अमळनेरकरांची ओळख ही भारतातील बहुतांश चारचाकी वाहनांवर लावलेल्या श्री मंगळग्रह मंदिराच्या स्टिकरवरून होते, ही अभिमानाची बाब आहे. या जन्मोत्सवादरम्यान बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक भाविकाने आपल्या अमळनेरचे नाव काढले पाहिजे.कोणाचीही असुविधा होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. आमंत्रण दिल्यानुसार मंत्री, खासदार आमदार, उच्चपदस्थ अधिकारी यांचा अचानक दौरा ठरू शकतो.त्यामुळे पोलिस प्रशासनावरचा ताण वाढू शकतो. यासाठी पोलीस प्रशासनावर अवलंबुन न राहता आपण प्रत्येकाने जबाबदारीने सेवा द्यावी.

   
खासदार वाघ म्हणाल्या की, या जन्मोत्सवादरम्यान शहरातील रस्ते, पथदिवे, सुशोभिकरण या बाबींकडे पालिकाबरोबरच सर्वांनीच जबाबदारीने पाहिले पाहिजे, जेणेकरुन आपल्या अमळनेरचे नाव खराब होणार नाही. हा प्रत्येकाने आपल्या घरचा कार्यक्रम समजून जबाबदारीने सेवाकार्य करावे..
    यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी तिनही दिवस होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा, त्यासाठी सुरू असलेली तयारी बाबत तसेच विविध समित्यांची माहिती दिली.
बैठकीत मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे,  संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, उज्वला शहा, आशिष चौधरी, ए. डी. भदाने, बाळा पवार, उमाकांत हिरे, चंद्रकांत महाजन, राहुल पाटील, निलेश महाजन तसेच राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.