लोक न्यूज
पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी अमळनेर नगर परिषदेकडून एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांच्या प्रेरणेतून यंदाचा गणपती शाळू मातीपासून साकारण्यात आला असून तो संपूर्णपणे पाण्यात विरघळणारा आणि पर्यावरणास अनुकूल आहे.
या उपक्रमाअंतर्गत नगर परिषदेने स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळू माती गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर वर्कशॉपमध्ये नगर परिषदेचे कर्मचारी श्री. अविनाश बोरसे यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे श्री. बोरसे यांनी कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेताही मागील ९ वर्षांपासून आपल्या घरी शाळू मातीचे गणपती साकारले आहेत. त्यांनी ही कला यूट्यूबद्वारे आत्मसात केली असून ती त्यांनी छंद म्हणून जोपासली आहे.
अमळनेर नगर परिषदेच्या कार्यालयात साकारलेली गणेशमूर्ती अंदाजे १ फूट उंच असून ती ३ ते ४ दिवसांत तयार करण्यात आली. या मूर्तीचे रंगसुद्धा संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक केले जाईल . मूर्ती पाण्यात विसर्जन केल्यानंतर कोणताही अपाय न होता संपूर्ण विरघळते.
नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणपती बसवावेत, हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विविध शाळा आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातूनही अशा कार्यशाळांचे आयोजन अमळनेर नगर परिषदे मार्फत करण्यात आले होते.
नगर परिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हा एक प्रेरणादायी पाऊल आहे.