लोक न्यूज

तालुक्यातील मारवड मंडळात ता.२९ रोजी १२० मि.मी.पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८२ घरातील अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने ते कुटुंब उघड्यावर आले आहेत.
तर कळमसरेत अतिवृष्टीमुळे सुमारे १५ घरांची पडझड झाली असून दुसऱ्या २५ घरांमध्ये पुराचे पाणी साचले होते.
     

अमळनेर तालुक्यात अति वृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी , गावांचा संपर्क तुटला , शेतांचे अतोनात नुकसान झाले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तातडीने ग्राम महसूल अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना आपद्ग्रस्तांच्या मदतीला पाठवले.  वासरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील गल्लीतील लोकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्यांना समाज मंदिरात तसेच गावातील उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली. सुमारे ८२ कुटुंब उघड्यावर आली आहेत. काहींची घरे पडली तर सर्वांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू  अन्न धान्याची नासाडी झाली.  इतर गावकरी  मदतीला धावले आणि त्यांच्यातर्फे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाच्या  भोजनाची व्यवस्थाही ग्रामस्थांनी केली. दुसऱ्या दिवशी वासरे येथील सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पाटील यांनी दिवसा 

तर लायन्स क्लब अमळनेर यांनी रात्रीचे जेवण दिले.  तर कळमसरे ,निम , शहापूर,  येथील अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात हलवण्यात आले आहे. आज ता. 30 रोजी वासरे येथे ८२ कुटुंबाचे नुकसान झाले असून यावेळी ग्राम महसूल अधिकारी

मुकेश देसले, ग्रामपंचायत अधिकारी अशोक पाटील, कृषी सहाय्यक गणेश पाटील यांनी नुकसानीचा संयुक्त पंचनामा केला.
कळमसरेत अतिवृष्टीमुळे सुमारे १५ घरांची पडझड झाली असून दुसऱ्या २५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्य तसेच काही संसारोपयोगी वस्तूंची देखील नुकसान झाले आहे. कळमसरे येथील स्वस्त धान्य दुकानात पुराचे पाणी शिरल्यामुळे सुमारे 30 क्विंटल धान्याची नासाडी झाली असून पंचनामा करण्यात आला आहे.
सदर नुकसानीचे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी कळमसरे भूषण पाटील,ग्रामपंचायत अधिकारी ज्ञात्नेश्वर पाटील कृषी सहायक अजय पवार, पोलीस पाटील गोपाल माळी, कोतवाल आधार सोनवणे
यांचा उपस्थितीत करण्यात आला.तसेच टाकरखेडा , मुडी, मांडळ येथे ढग फुटी सदृश्य पावसामुळे हजारो हेक्टर मका , कपाशी आणि उडीद ,मूग पिकांचे नुकसान झाले आहे. पिके शेतात आडवी पडली आहेत.
      घटनास्थळी खासदार स्मिता वाघ , माजी जि.प. सदस्य जयश्री पाटील ,   बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, भैरवी पलांडे , बाजार समितीचे संचालक समाधान धनगर,डॉ अनिल शिंदे, एल. टी. पाटील, यांच्यासह प्रशांत धमके यांनी वासरे व इतर गावांना भेटी देऊन आपद्ग्रस्तांचे सांत्वन केले. खासदार वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरू असल्याने तालुक्यात नेमके किती नुकसान झाले हे कळू शकले नाही.

*वासरे गावाची संवेदनशीलता-----*
वासरे येथे सर्व बाधीत कुटुंबाना काल आणि आज निवासाची सोय करीत जेवणाची सोय देखील उपलब्ध करून दिली आहे. बऱ्याच जणांनी बाधित कुटुंबाना  आपल्या घरी आसरा दिला आहे.ग्रामपंचायती मार्फत पाच किलो गहू पीठ, पाच किलो साखर,  चहा पावडर,एक लिटर खाण्याचे तेल, मीठ पिशवी, मिरची पूड असा लहानसा शिधा ग्रामपंचायत मार्फत वाटप करण्यात आले.

सरसकट पंचनामा करण्याची मागणी*---
    मारवड मंडळासह तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचा  सरसकट पंचनामा करण्यात यावा अशी मागणी असून शासनाने व लोकप्रतिनिधी यांनी याबाबत लक्ष घालावे अशीही मागणी होत आहे. दरम्यान  अमळनेर शहरांसह तालुक्यातील अनेक  गावांमध्ये नुकसान झाले आहे. वासरे, कळमसरे, शहापूर, खेडी, खर्दे, पाडसे, तांदळी, नीम, मारवड, पाडळसरे, गोवर्धन, बोहरा, डांगरी, सात्री, बोरगावं आदी गावातील शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

    

रुपेशकुमार सुराणा (तहसीलदार )


मारवड मंडळासह तालुक्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याठिकाणचे शेती पिकांचे पंचनामे करण्यात येतील. आज वासरे सह ज्या गावात घराचे नुकसान झाले आहे. त्यांचा पंचनामा करून  बाधित कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलवीण्यात आले आहे
.